उत्पन्नापेक्षा साडेतीन कोटी अधिकची संपत्ती; आ. राजन साळवींविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्पन्नापेक्षा 118 टक्के म्हणजे साडेतीन कोटी संपत्ती जास्त असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आला आहे. पोलीस एफआयआरमध्ये आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती 2 कोटी 92 लाख अंदाजे असून त्यांनी 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा एसीबीचा आरोप आहे.

ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा साळवी यांनी ही बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याच मालमत्तांची चौकशी करण्याकरता आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार राजन साळवी यांच्या घरी पुन्हा छापे मारले. १३ जानेवारी रोजीच राजन साळवी रायगड लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कुटुंबासह चौकशीकरता गेले होते. परंतु, आता यापुढे एसीबीला सहकार्य करणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, आज पुन्हा एसीबीने त्यांच्या घरी धाड मारली असून सकाळपासून त्यांच्या घरी चौकशी सुरू आहे.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पावलं कुठे पडतात हे मला समजतं. त्यामुळे ते माझ्याकडे येणार आहेत, हे मला माहित होतं. ते रत्नागिरीतील हॉटेलमध्ये उतरले होते. तिथून ते माझ्याकडे येणार असल्याचं मला माझ्या विश्वासूंनी सांगितलं होतं, अशी माहिती राजन साळवी यांनी आज माध्यमांना दिली आहे.