देवरूख:- तदेव लग्नं…सुदिनं तदेव… ताराबलं चंद्रबलं तदेव। विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघियुगं स्मरामि। च्या मंत्रोपचारांच्या मंगलमय सुरात व हर हर मार्लेश्वर च्या जयघोष सनईचौघड्यांच्या सुर,फटाक्यक्याच्या आतशबाजितश्री देव मार्लेश्वर आणि गिरीजा देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला. हर हर मार्लेश्वरच्य जयघोष करीत भक्ताची पावले विवाह सोहळ्याकडे जात होती.या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कड्या- कपारीत गर्दी केली होती.
आंगवली येथील मुळ मठात विवाहापुर्वीचे सर्व विधी झाल्यावर रात्री श्री देव मार्लेश्वरची मुर्ती; चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लीकार्जुनाची मुर्तीही पालखीत स्थानापन्न झाली. त्यानंतर आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, देवरुखची दिंडी, विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्वर देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले.
रविवारी मध्यरात्री १२ वाजता हर हर मार्लेश्वरचा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्वरची पालखी मार्गस्थ झाली. पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते.
शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरीजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तीनही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर तीनही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच. पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले.
दुपारी हळद लावणीचा कार्यक्रम झाला आणि विवाहासाठी ३६० मानकर्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर मुहुर्तावर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवीचे लग्न लावण्यात आले. यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता.मंगलाष्टका आणि मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. तदैंव लग्नम… चे सुर मंडपात उमटले आणि सर्व भाविकांनी परमेश्वराचे लग्न लावण्याचा अपूर्व योग साधला.
विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली.त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा, नवरीला आहेर देण्यात आला. यावेळी सौभाग्यवतींनी करंबेळीच्या डोहात फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगड्या, हळद, पिंजर असे सामान असलेली परडी अर्पण केली. त्यानंतर नवविवाहितांच्या मुर्त्या सर्व विधी झाल्यावर मार्लेश्वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या.
आज यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण मारळ परिसरासह मार्लेश्वर पायथा ते शिखर, धारेश्वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवरूखचे पोलिस निरीक्षक प्रदीप पवार हे कालपासूनच यात्रास्थळी विशेष लक्ष ठेवून होते. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू केली होती. याचप्रमाणे देवरूख, संगमेश्वर, साखरपा, माखजन, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली अशा आगारातून महामंडळाच्या जादा फेर्याही सोडण्यात आल्या होत्या.