खेड:- जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या एका पीडित तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खेडमधील आरोपी संतोष लक्ष्मण पालांडे (रा. तळे, तालुका खेड जिल्हा रत्नागिरी) यास अतिरिक्त सत्र न्यायालय खेड यांनी बारा वर्ष सक्त मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय खेडचे न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.
खेड तालुक्यात 2015 साली ही घटना घडली होती. येथे विवाहित महिला जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी संतोष लक्ष्मण पालांडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार 20-6-2015 या कालावधीमध्ये ही घटना घडली होती, या संदर्भात खेड पोलिसांनी खेड तालुक्यातील तळे येथील संतोष लक्ष्मण पालांडे यांच्या विरोधात भादवि कलम 376 (1), 505 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. संतोष लक्ष्मण पालांडे या आरोपीला भादवि कलम 376 (1) अन्वये बारा वर्षे सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तसेच भादवी कलम 506 या कलमाखाली तीन वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये इतका दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठेवण्यात आलेली आहे. याप्रकरणी सरकारी वकील ऍड मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करून संपूर्ण केसचे कामकाज पाहिले.