पाऊस नसल्याने नुकसान टळले
रत्नागिरी:- रविवारी दुपारी समुद्राला मोठी भरती आली. या उधाणाच्या लाटांचे तांडव कोकण किनारपट्टीवर सलग दुसर्या दिवशी पहायला मिळाले. किनारपट्टी भागात चार ते साडेचार मिटर उंचीच्या लाटा येऊन धडकत होत्या. पावसाने विश्रांती घेतल्याने उधाणाचा मोठा फटका किनारपट्टीला बसला नाही.
रविवारी आलेल्या उधाणाचा सर्वाधिक फटका मिऱ्या बंधाऱ्याला बसला. रविवारी दुपारी बारानंतर समुद्राला मोठी भरती आली. समुद्राच्या भरतीच्या पाण्याने नियोजित हद्द ओलांडून रहिवासी भागात काही प्रमाणात शिरकाव केला होता. शनिवार पर्यंत मुसळधार कोसळणारा पाऊस रविवारी पहाटे पासून थांबला. यामुळे उधाणाचा मोठा फटका किनारपट्टीला बसला नाही.
रविवारी उधाणाच्या या अजस्त्र लाटा सध्या या बंधाऱ्यावरून रहिवासी वस्तीत येत होत्या. मिऱ्या किनाऱ्यावरील बार्जचे देखील या उधाणाच्या लाटांनी नुकसान केले. बार्जवरून मोठमोठ्या लाटा उसळत होत्या तर बार्जनजीकच असलेल्या सावंत यांच्या बागेत समुद्राचे पाणी घुसले होते. किनाऱ्याला धडक देणाऱ्या महाकाय सागरी लाटांमुळे मिऱ्या परिसरातील धूपप्रतिबंधक काही ठिकाणी थोडा खचला आहे. येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणचा बंधारा वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.