रत्नागिरी:- सावकारी परवान्याच्या नावाखाली सर्वसामान्य गरीब -गरजूंना लुटणार्या सावकार निलेश कीर यांनी कर्जदारांकडून घेतलेले बॉन्ड, गाड्याची कागदपत्रे गायब केली असली तरी त्याच्या मोबाईलमध्ये अनेक कर्जदारांच्या कागदपत्राच्या फोटोकॉपी असल्याचे पुढे आले आहे. तर त्याच्या मोबाईल मध्ये काही अक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’ पोलीसांना आढळल्या आहेत. त्यांच्या संबध कर्जदारांशी आहे का? याचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता आहे. निलेश कीरला सहा दिवसांची पोलीस कोठडी वाढली असल्याने पोलीसांना तपासात खोलवर जाण्याची संधी मिळाली आहे.
चार दिवसांपुर्वी मिर्या येथील निलशे कीर याला शहर पोलीसांनी बेकायदेशीर सावकारी प्रकरणी ताब्यात घेतले होते. पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर आता तक्रारदार कर्जदारीचा ओघ शहर पोलीस स्थानकात वाढला आहे. आतापर्यंत आठ कर्जदारांनी आपली पिळवणूक झाल्याची तक्रार पोलीसांकडे केली असून त्यांना पहिल्या गुन्ह्यात पोलीसांनी साक्षिदार म्हणून नोंदविले आहे.
अल्प कर्जाच्या बदल्यात निलश कीर याने अनेकांची पिळवणूक करुन त्यांच्याकडून लाखो रुपयांसह काही कोटींची मालमत्ता हडप केली आहे. करबुडे येथील जयवंत कळंबटे यांची साडेसात एकर जागा केवळ २० हजारांच्या बदल्यात घेवून त्यांच्याकडे साडेपाच लाखांची मागणी निलेश कीर करत होता. अखेर निलेशच्या त्रासाला कंटाळून जयवंत कळंबटे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत.
सावकारीचा पहिला गुन्हा रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर निलेश कीर सावध झाला होता. आपल्यावर कारवाई होणार हे त्याला कदाचित समजले असावे त्यानंतर त्याने आपल्याकडील कर्जदारांची सर्व कागदपत्रे गायब केली आहे. कागदपत्रे गहाळ झाल्याचे तो पोलीसांना सांगत आहे. मात्र काही कागदपत्राच्या फोटोकॉपी पोलीसांना त्याच्या मोबाईलमध्ये आढळल्या आहे. तर कर्जदारांशी ज्या भाषेत तो दमदाटी, शिविगाळ करत होता. त्याच्या ऑडिओ क्लिप त्यानेच रेकॉर्ड करुन ठेवल्या आहेत. त्या पोलीसांना सापडल्या आहेत. तर त्याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’ आहेत. त्याचा या गुन्ह्याशी काही संबध आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे. निलेश कीर याचा मोबाईल पोलिसांसाठी मुख्य पुरवा ठरणार आहे.