व्हेल उलटी तस्करी प्रकरणी सहा जणांना अटक

रत्नागिरी, मालवण, देवगड येथील संशयितांच्या घरांची झाडाझडती

रत्नागिरी:- सागाव (ता. शिराळा, जि. सांगली) येथे उघडकीस आलेल्या व्हेल माशाच्या उलटी तस्करी केल्या प्रकरणी वन विभागाने तयार केलेल्या दोन पथकांच्या तपासात आणखी काही नावे निष्पन्न झाली आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने तपास यंत्रणा गतिमान केली आहे.

रत्नागिरी, मालवण, देवगड येथील निष्पन्न झालेल्या संशयित व्यक्तींच्या घरांची तपासणी करण्यात आली. मात्र संशयितांनी पलायन केल्याचे आढळून आले. या तस्करी प्रकरणी आजअखेर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तपासासाठी राज्यात अन्यत्र शोधकार्य सुरू झाले असून, आजही काही घरांची झाडाझडती घेतल्याची अशी माहिती सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी दिली.

शुक्रवारी (ता. १५) दुपारी चारच्या दरम्यान सागाव येथे तस्करी उघडकीस आली होती. पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. वनविभागाने कारवाई करून व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या रोहन पाटील, प्रथमेश मोरे, दिग्विजय पाटील, लक्ष्मण सावळे, दत्तात्रय पाटील यांना अटक केली होती. त्यानंतर काल (ता. १९) जयवंत पाटील यास अटक केली आहे.