रत्नागिरी:- घाटमाथ्यावरून साखर घेवून येणारे ट्रक जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या बंदरावर येणे बंद झाले. साखरेची निर्यातच बंद झाल्याने रत्नागिरीतील चिरेखाणीचा व्यवसायही डबघाईला येत आहेत. जयगड बंदरावर साखर घेऊन येणारे ट्रक येथील चिरा घाटमाथ्यावर नेत होते. जाताना हे ट्रक चिरा घेवून जात होते. साखर घेऊन येणारे ट्रक बंद झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात जाणार्या चिर्याची वाहतूकही थंडावली आहे. गेल्यावर्षी दीडशेपेक्षा अधिक असणार्या चिरेखाणी यावर्षी पन्नास टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी मलकापूर-उदगीर येथून बॉक्साईट खनिज घेऊन ट्रक जयगड बंदरात येत होते. परत
जाताना या ट्रकमधून रत्नागिरीतला चिरा पश्चिम महाराष्ट्रात नेला जात होता. बॉक्साईट आता जयगड
बंदरात येणे गेल्या अनेक वर्षांपासून बंद झाले आहे. त्यामुळे या बॉक्साईट आणणार्या ट्रकमधून चिरा जाणेही बंद झाले. त्यावेळी चिरेखाणीचा उद्योग धोक्यात आला होता.
त्यानंतर साखरेच्या निर्यातीने या चिरेखाणी उद्योगाला सावरले होते. परदेशात पाठवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून ट्रकांमधून साखरेची पोती जयगड बंदरात आणली जात होती. याच ट्रकातून रत्नागिरीतील चिरा पश्चिम महाराष्ट्रात पाठवला जात होता. परंतु आता साखर निर्यातसुद्धा बंद झाल्याने हे ट्रक रत्नागिरीत येणेच बंद झाले. घाटमाथ्यावरील ट्रकांमधून चिर्याची वाहतूक बंद झाल्याचा परिणाम रत्नागिरीतील चिरेखाणी उद्योगावर झाला आहे. साखर निर्यात बंदी होईपर्यंत सुमारे दीडशे ते दोनशे चिरेखाणी सुरू होत्या. सध्या 50 टक्केच चिरेखाणी सुरू असून, त्यातील काही चिरेखाणी आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात एखाद्या ट्रकने चिरा पाठवायचा म्हटला तर त्याचा वाहतूक खर्चच परवडत नाही. रत्नागिरीत येणारे ट्रक रिकामे परत जाण्याऐवजी येथील चिरा काहीशा कमी दरात घाटमाथ्यावर पोहोचवत होते.