जिल्ह्यात १ लाख ६२ हजार बालकांची आरोग्य तपासणी

१८५ बालकांना किरकोळ आजार;२८ बालकांच्या ह्रदय शस्त्रकिया

रत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सन २०२३‚२४ या वर्षात जिल्ह्यातील ८ हजार ८४६ अंगणवाड्या व शाळातील तब्बल १ लाख ६२ हजार ९५१ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८५ बालकांवर किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २८ बालकांच्या ह्रदय शस्त्रकिया करण्यात आल्या आहेत.

एप्रिल २०१३ पासून अंगणवाडी व शालेय मुलांच्या आरोग्य संवर्धन व विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिह्यात राबविला जात आहे. वय वर्षे ० ते १८ या वयोगटातील मुला‚मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर या योजनेतून मोफत उपचार केले जातात. जिह्यात या योजनेद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून वर्षभरात आतापर्यंत १८५ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

या योजनेतून ह्रदय शस्त्रकियांसाठी एकूण ३० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये अंगणवाडी १ चे १६ मुले, अंगणवाडी २ मधील ३ मुले तर शाळामधील ११ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी अंगणवाडी १ मधील १५ बालके, अंगण्वाडी २ मधील ३ बालके, आणि शाळामधील १० विद्यार्थ्यांच्या ह्रदय शस्त्रकिया झाल्याचे आरबीएसके कक्षामार्पत सांगण्यात आले आहे. अजूनही २ बालकांच्या शस्त्रकिया होणे शिल्लक राहिले आहे.

यातील बहुतांश बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील आहेत. या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गंत रत्नागिरी जिह्यात जन्मतच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात. जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्पत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. गेल्या शैक्षणिक वर्षात जिह्यातील १८५ बालके व विद्यार्थ्यांवर या योजनेतून शस्त्रक्रिया झाली.
प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात. तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.