दापोली:- दापोली तालुक्यातील शिरवणेचे सरपंच सागर शांताराम रेमजे यांच्यासह अन्य तीन संशयितांवर जप्त केलेला वाळूसाठा व सुमारे आठ लाखांचे सक्शन पंप, बोट व अन्य साहित्य चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरवणे गावाजवळ असलेल्या कोडजाई नदीपात्रात महसूल विभागाच्या मंडल अधिकारी यांनी १३ नोव्हेंबरला कारवाई करत नदीकिनारी असलेल्या जागेत साठा केलेली सुमारे १० ते १२ ब्रास वाळू, नदीपात्रात सक्शन पंप बसवलेली बोट व अन्य साहित्य असा एकूण ८ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हा माल शिरवणे येथील पोलिस पाटील उमेश तुळशीराम येलवे यांच्या ताब्यात दिला होता. मंडल अधिकारी सीमा कात्रुट यांनी दापोली पोलिस ठाण्यात वाळू चोरी करणाऱ्या अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता; मात्र २१ नोव्हेंबरला सकाळी ७.३०च्या सुमारास जप्त मुद्देमाल ज्या ठिकाणी ठेवला होता त्या शिरवणे येथील जुवाडा येथे पोलिस पाटील उमेश तुळशीराम येलवे गेले असता त्यांना तो
मुद्देमाल दिसला नाही. या मुद्देमालाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात पप्पू कोळी (रा. ठाणे, सध्या दापोली), शिरवणेचे सरपंच सागर शांताराम रेमजे, सिद्धेश सुरेश करमरकर (रा. कोल्हापूर), किशोर गुरव (रा. दाभिळ) या ४ संशयितांनी ४ हजार रुपये किमतीची सुमारे ३ ते ४ ब्रास वाळू, ८ लाखांचे सक्शन पंप, बोट व त्यावरील सर्व साहित्य असा ऐवज महसूल विभागाचे अधिकारी व पोलिस पाटील येलवे यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक यादव करत आहेत.