चिपळूण:- शहरा लगतच्या एका गावात एका अल्पवयीन बालिकेवर वारंवार अतिप्रसंग झाल्याची तक्रार पीडितेच्या नातेवाईकांनी केल्यावर संबंधित व्यक्तीवर चिपळूण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित बालिका बेळगावीमधील आहे. तिचे वडील कामानिमित्त कळंबस्ते गावात राहतात. आठ दिवसापूर्वी संशयित आरोपी दिनेश धोंडू जाधव (५१, कळंबस्ते, गुरववाडी) याने आपल्या पत्नीला भात कापण्यासाठी शेतावर पाठवले आणि तो घरातच थांबला.
आपल्यासोबत पती न आल्याने पत्नीला संशय आल्यानंतर पत्नी पुन्हा घरी आली तेव्हा ती अल्पवयीन मुलगी आणि संशयित घरात एकत्र संशयास्पद हालचाली करताना आढळले.
हे पाहून पत्नीने घरात गोंधळ घातला. त्यामुळे गावातील लोक जमा झाले. त्यानंतर गावात बैठक झाली. संशयित जाधवला प्रतिष्ठित लोकांनी जाब विचारला. तेव्हा त्याने एकदाच शरीरसंबंध ठेवल्याचे बैठकीत सांगितले. मात्र संबंधित पीडित बालिकेने संशयित व्यक्तीने मला धमकवून चार ते पाच वेळा माझ्याशी शरीर संबंध ठेवल्याचे बैठकीत सांगितले. गावच्या बैठकीत या विषयावर तोडगा निघाला नाही व या प्रकरणावर पडदा पाडण्यात आला. परंतु हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यामुळे पीडित बालिकेचे नातेवाईक, कामाच्या निमित्ताने बेळगावहून चिपळूणमध्ये आलेल्या पन्नासहून अधिक महिलांनी मंगळवारी दुपारी चिपळूण पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर संशयित व्यक्तीच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.