रत्नागिरी:- शासकीय सेवेत समायोजन करून घ्यावे, या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे. सलग दुसरर्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर या कंत्राटी कर्मचार्यांनी निदर्शने केली. जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांनी आरोग्य सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले. त्यांनी मुंबईतील आझाद मैदानातही जोरदार आंदोलन केल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रातील आरोग्य सेवेवर परिणाम झालेले आहे.
विशेष म्हणजे आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका या कामबंद आंदोलनात उतरल्याने तेथील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र शासनाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट
केले.सध्या जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्र व आरोग्य केंद्रांतील आरोग्य सेविका संपात गेल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी सलग दुसर्या दिवशी या सर्वांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी भेट देऊन या आंदोलनकर्त्यांची चौकशी केली. तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवू, असे यावेळी सांगितले.