खेड – मुंबई -गोवा महामार्गावर खेडमधील एका हॉटेलसमोरील पान टपरीवर दि . २६ रोजी रात्री १२:१० वाजता चार जणांनी एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . मारहाण करणाऱ्यांमध्ये एक जण मंडणगड येथील पोलिस कर्मचारी असून , जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्याचे निलंबित केले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप विश्राम धाडवे ( ३७ , रा . सुकिवली कुणबीवाडी , खेड ) व त्याचा मित्र महामार्गावरील हॉटेलसमोरच्या पानटपरीवर दि . २६ रोजी रात्री १२ वाजता सिगारेट ओढत होते . त्यावेळी एका पांढऱ्या कारमधून साहील मोरे व शैलेश भगवान चव्हाण तिथे आले . त्यापैकी शैलेश चव्हाण याने संदीपला पाहून आईवरून शिवीगाळ केली व तो त्याला मारण्यासाठी अंगावर धावून गेला . त्यावेळी साहील मोरे यांनी चव्हाण याला धरून गाडीत बसवले व ते तेथून निघून गेले . त्याच दरम्यान तेथे स्वप्नील रंगराव घाटगे ( ३८ , रा . योगायोग सोसायटी , शिवतर खेड ) व निलेश रामचंद्र जगताप ( ३५ ) हे तेथे आले . स्वप्नील घाटगे याने संदीप धाडवे याच्या दोन- तीन वेळा डाव्या कानाखाली मारले . निलेश जगताप याने संदीपचे दोन्ही हात धरून ठेवले होते . सदरची घटना संदीपचा मित्र समीर कदम याने मोबाइलवरून संदीपचा मोठा भाऊ सचिन विश्राम धाडवे याला कळविल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी सचिन धाडवे व वाडीतील मुले तेथे आली . मारहाण करणारे तेथून पळून गेले . ते येण्याआधी मंडणगड पोलिस स्थानकातील कर्मचारी सुशांत रंगराव घाडगे हा स्वप्नीलचा भाऊ तेथे आला . त्याने हातातील बीअरची बाटली संदीपला मारण्यासाठी उगारली . तेथे असलेला सुधीर परशुराम राणीम मध्ये आल्याने ती बाटली त्याच्या डाव्या कानाच्या वरील बाजूस लागून फुटली व त्याला दुखापत झाली . त्यामुळे राणीम रक्तबंबाळ झाल्याचे संदीपने तक्रारीत नमूद केले आहे . पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील घाटगे , निलेश जगताप , सुशांत घाटगे ( ३० ) व शैलेश चव्हाण ( ३४ रा . वेरळ , ता . खेड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे .