महामार्गाचे ४५ किमी दुपदरीकरण अपूर्ण

मुंबई-गोवा महामार्ग; उड्डाणपुलांसह मार्ग होण्यास उजाडणार जून २०२४

    रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामधील अडचणी संपता संपेनात. आरवली ते काटे या टप्प्याचे काम करणाऱ्या एमईपी कंपनीने आर्थिकदृष्ट्या हे काम न परवडणारे असल्याचे स्पष्ट करत पर्याय एचएमपीएल ही कंपनी दिली आहे तर बावनदी ते वाकेड या टप्प्याचे काम ईगल कंपनीला देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९२ किमी चौपदरीकरणापैकी अजून ४५ किमीचे दुपदरीचे काम शिल्लक आहे. त्यात उड्डाणपुलांचा मोठा प्रश्न आहे. महामार्गाचे सिंगल लेन किंवा दुपदरीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत होणार असल्याचा दावा केला जात असला तरी उड्डाणपुलांसह हे काम पूर्ण व्हायला जून २०२४ उजाडणार असल्याचे बोलले जात आहे.

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण गेली 13 वर्षे रखडले आहे. सहा टप्प्यात सुमारे ९२ किमी कामाची विभागणी करण्यात आली होती. त्यापैकी चिपळूणपर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे; मात्र आरवली ते कांटे आणि बावनदी ते वाकेड या दोन टप्प्यातील काम मात्र अजून अपूर्ण आहे. याचा ठेका घेतलेल्या कंपन्यांनी आर्थिकदृष्या हे काम परवडणारे नसल्याचे सांगितल्याने त्या बदलण्यात आल्या आहेत. आरवली ते कांटे हा टप्पा सुमारे ६०० कोटीचा आहे. एमईपी आणि रोडवेज कंपनीने हे काम घेतले होते. ते ३५ टक्के झाले आहे. परंतु आता एचएमपीएल कंपनीला हे काम देण्यात आले. ८२८ कोटीचा हा टप्पा असून आतापर्यंत त्याचे काम ३० टक्के झाले आहे. बावनदीवरील पुलाचे काम मात्र ह्यान इन्फ्रा कंपनीकडे आहे. जिल्ह्यातील महामार्गाचे काम ९२ किमीचे आहे. त्यापैकी अजून ४५ किमीचे दुपदरीकरणाचे काम राहिले आहे. आतापर्यंत ४७ किमी काम पूर्ण झाले आहे.