रत्नागिरी:- रायगडमधील कोलाड येथून माल भरून कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या मालगाडीच्या ब्रेक कम जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागला. ती मालगाडी भोके स्थानकाजवळ थांबवल्याचा संदेश मिळताच कोकण रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली. मालगाडी सुरक्षा तपासणीसाठी स्थानकातच उभी होती. रत्नागिरी स्थानकावरील सतर्कतेसाठीचा भोंगाही वाजला. हा प्रकार बुधवारी (ता. 18) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला; मात्र मॉकड्रील असल्याचे कोकण रेल्वेप्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोलाड येथून मालगाडी रत्नागिरी तालुक्यातील भोके स्थानकाजवळ आली असता रेल्वे बोगद्याच्या बाहेर गाडीच्या जनरेटर कम ब्रेक व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागल्याची माहिती मुख्य स्थानकापर्यंत पोचली. रेल्वेच्या सर्वच गाड्यांमध्ये अग्निरोध यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे गाडीतून थोडा देखील धूर आला तरी ही यंत्रणा वेळीच अलर्ट होतात. त्यानुसार मालगाडी भोके स्थानकातच थांबवण्यात आली होती. कोकण रेल्वेच्या सुरक्षा पथकाकडून तत्काळ घटनास्थळी दाखल होत मालगाडीची तपासणी केली. सर्व व्यवस्थित असल्याचे समजल्यानंतर अर्ध्या तासाने मालगाडी मार्गस्थ झाली. यंत्रणा सतर्क असल्याची तालीम अशा मॉकड्रीलद्वारे करण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.