रत्नागिरीत होमगार्ड तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील कापडगाव-फणसवाडी येथील तरुण होमगार्ड कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कापडगाव परिसरात मात्र तरुण होमगार्डने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

प्रथमेश राजाराम पाडावे (वय 25, रा. कापडगाव- फणसवाडी, रत्नागिरी) असे मृत होमगार्डचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 15) दुपारी साडेबाराच्या सुमारास कापडगाव येथे घडली. पंचवीस वर्षाचा प्रथमेश पाडावे हा 2021 च्या होमगार्ड भरतीमध्ये दाखल झाला होता. होमगार्ड मध्ये त्याला एक वर्ष झाले होते. रत्नागिरी होमगार्डमध्ये कर्तव्य बजावत होता. त्याच्या लग्नालाही एक वर्षे दोन महिने झाले होते.

रविवारी दुपारी कोणत्यातरी अज्ञात कारणाने होमगार्ड प्रथमेश याने घरातील बेडरुमच्या वाश्याला नायलॉनची दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत पाली दुरक्षेत्र पोलिस ठाण्यात प्रथमेशचे वडिल राजाराम पाडावे यांनी खबर दिली. खबर मिळताच पाली दुरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष काबळे व मोहन कांबळे यांनी कापडगाव-फणसवाडी येथे धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. होमगार्डचे कर्मचारीही पाली व जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र होमगार्ड प्रथमेशने आत्महत्या करण्यासारखे पाऊल का उचलले या बद्दल माहिती मिळू शकली नाही. या तरुणाच्या अचानक जाण्याने होमगार्ड कार्यालयातील कर्मचारी व कापडगाव-फणसवाडी येथील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सांयकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पाली दुरक्षेत्राचे पोलिस अमंलदार करत आहेत.