रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक मंडळाची निवडणूक महायुतीमार्फत लढवली जाणार असून प्रचाराचा शुभारंभ अधिकृतरित्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार दि.30 सप्टेंबरपर्यंत सर्व निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती आदेशाचा कालावधी संपुष्टात आला असून प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक मंडळाची निवडणूक आता कोणत्याही क्षणी होणार आहे.
पदवीधर संघटना, उर्दू संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना यांची महायुती करण्यात आली असून साळवीस्टॉप येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात मेळावा उत्साहात संपन्न झाला.
महायुती पॅनेलचे श्री.दीपक शिंदे, श्री.बळीराम मोरे, पदवीधर संघटनेचे श्री.पावसकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष श्री.तांबे, पुरोगामी संघटनेचे श्री.काटकर, श्री.खानविलकर, महिला प्रतिनिधी श्रीमती खेडेकर, तालुका उमेदवार प्रवीण देसाई, जिल्हा उमेदवार श्रीमती मालीम, श्री.म्हस्के, श्री.सावंत, श्री.वाजे, उमेश केसरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पतपेढी संचालक मंडळाची निवडणूक दि.4 नोव्हेंबरला होण्याची शक्यता असून महायुती सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूणमधील इमारत, जागेसंबंधी विरोधक सातत्याने ओरडत असून श्री.बळीराम मोरे यांनी सर्व वस्तुस्थिती कथन केले. 17 गुंठे जागा विकत घेऊन उत्कृष्ट इमारत प्राथमिक शिक्षक पतपेढीने उभारली असून भविष्यातून त्यातून उत्पन्न मिळणार असल्याचे श्री.बळीराम मोरे यांनी सांगितले.
संघटनात्मक कामे, सध्या शासन, प्रशासनामार्फत सुरू असलेले सर्वेक्षण, परीक्षा लिंक भरणे या कामामध्ये गुंतवून शिक्षकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे श्री.विजयकुमार पंडित यांनी सांगितले. सर्वेक्षणावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला असून प्रशासकीय ग्रुपमधून सर्वजण बाहेर पडले आहेत. शिक्षकांना शिकवू द्या हीच सगळ्यांची योग्य मागणी असल्याचे श्री.विजयकुमार पंडित यांनी सांगितले.
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असून त्याबाबत संघटना विरूद्ध विरूद्ध राज्यशासन असा संघर्ष सुरू आहे. जिल्हा स्तरावर प्रलंबित असलेली शिक्षकांची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे. महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना सभासदांनी प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करावे. कोणत्याही संघटना स्वार्थ, स्वहित जपणे, विश्वासघात करून मुल्य पायदळी तुडवण्यासाठी एकत्र आले आहे. यावर सभासदांनी विश्वास ठेवू नये, अपप्रचाराला बळी पडू नये असा आवाहन महायुतीमार्फत करण्यात आले आहे. दीपक शिंदे, चंद्रकांत पावसकर, प्रवीण काटकर, मुश्ताक तांबे, प्रकाश माने, उमेदवार मनोज म्हस्के, उमेश केसरकर, नाजिमा मालिम, नरेंद्र सावंत, मुकुंद वाजे आदींनी मार्गदर्शन केले.