पोलीस श्वान ‘विराट’ ची विराट कामगिरी; अल्पवयीन मुलीचा जंगलात काढला माग

चिपळूण:- अलोरे-शिरगाव पोलीसांनी श्वान ‘विराट’ च्या मदतीने एका अल्पवयीन मुलीला जंगलातून शोधले. एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अधून-मधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेला जात येत असल्याच्या कारणावरून मुलीच्या वडीलांनी तिला रागवले. या कारणावरून घाबरून जाऊन ही अल्पवयीन मुलगी दिनांक 28/09/2023 रोजी 19:00 वा. आपल्या राहत्या घरातून निघून जाऊन पेढांबे येथील घनदाट जंगलात पळून गेली.

आपली मुलगी घरातून निघून गेल्यामुळे व तिचा शोध घेतला असता ती जवळपास कुठेही मिळून न आल्याने लागलीच तिच्या वडीलांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे गाठले व दिल्या फिर्यादिवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे येथे भा.दं.वि संहिता कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या मुलीच्या नातेवाईकांनी तसेच पोलीसांनी तिचा जंगलात शोध घेण्याकरिता शोध मोहीम राबवली परंतु ती रात्री मिळून आली नाही म्हणून पुनः दिनांक 29/09/2023 रोजी सकाळ पासूनच पोलीसांनी शोध मोहीम राबविली परंतु तरीही अल्पवयीन मुलगी मिळून आली नव्हती.
अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे चे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुजीत गडदे यांच्याद्वारे लागलीच रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या श्वान पथकाची मदत मागविण्यात आली व दिनांक 29/09/2023 रोजी सायंकाळी 16:00 वा श्वान ‘विराट’ ला त्याच्या हँडलरद्वारे या मुलीच्या घरातील तिच्या एका वापरत्या ‘टी-शर्ट’ चा गंध देण्यात आला. श्वान ‘विराट’ ला गंध मिळता क्षणी त्याने पेढांबे येथील घनदाट जंगलात माघ काढत तब्बल काही वेळातच पोलीसांना व तिच्या नातेवाईकांना त्या मुली जवळ नेऊन उभे केले.
या मुलीला श्वान विराट च्या मदतीने पोलीसांना पेढांबे येथील घनदाट जंगलातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या मुलीचे योग्य समुपदेशन करून तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे व तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेले आहे.