भावी शिक्षकांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर राज्यात आतापर्यंत एक लाख 65 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शिक्षक होण्यासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागानेे केले आहे.

राज्यातील माध्यमिक व जि. प. शाळांमध्ये शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी सध्या उमेदवारांची नोंदणी सुरू आहे. त्यांची अंतिम मुदत ही शुक्रवारपर्यंत (दि. 22) होती. मात्र आता मुदतवाढ दिली आहे. पुढील आठवड्यात बिंदुनामावली अंतिम झालेल्या जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे. सद्यस्थितीत एका जागेसाठी तीन उमेदवार नोकरीच्या स्पर्धेत आहेत. जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकपदांची अंतिम केलेली बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे.

प्रत्येक पदांची पडताळणी करुन त्याठिकाणी अंतिम मान्यता दिली जाते. आतापर्यंत राज्यातील 14 जिल्हा परिषदांची बिनामावली मान्य झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व जिल्ह्यांची बिंदुनामावली पूर्ण होणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती प्रक्रिया सुरू होईल.
पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला त्यांच्याकडील कागदपत्रे अपलोड करून प्रोफाईल तयार करून घ्यावे लागते. नोंदणी केलेल्या जवळपास 28 हजार उमेदवारांचे प्रोफाईल अद्याप तयार झालेले नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जाहिरातीतील जात संवर्गनिहाय, विषयानुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होऊन मेरिटनुसार भरती होणार आहे.
पवित्र पोर्टलनुसार 2017 ची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये अनेक जागा रिक्त राहिल्या. मागासवर्गीयांच्या जागा, माजी सैनिक व रिक्त असलेली पदे भरण्यात आलेली नाहीत. या जागा कन्व्हर्ट करून भरण्यात याव्यात, अशी 2017 च्या अभियोग्यता धारकांतून होत आहे. 2017 च्या परीक्षेपासून पाच वर्षे उलटत आली तरी ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी अभियोग्यता धारकांतून होत आहे.