रायगड:- मुंबई – गोवा महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलर चालकाने चालकाने दारूच्या नशेत समोर दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दुचाकीवरील संदेश सदानंद घाणेकर (वय 32) या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मूळचा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आहे.
गणेशोत्सव करून तो पुन्हा मुंबईकडे दुचाकी वरून चालला होता. मुंबई वडाळा गणेश नगर येथे राहणारा तरुण आहे. संदेश हा नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होता. कानसई गावच्या हद्दीत हॉटेल नवरत्न जवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालक दारूच्या नशेत सुकेळी कडून नागोठणेकडे भरधाव वेगात निघाला होता. याप्रकरणी मध्य प्रदेशातील ओमप्रकाश रामलाल पटेल (वय 36) या ट्रेलर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या अपघाताचे वृत्त कळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पोमण व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संदेश सदानंद घाणेकर याचं दोन वर्षांपूर्वी नुकतेच लग्न झालं होतं तो नोकरी निमित्त मुंबई वडाळा गणेश नगर येथे वास्तव्यास होता. आई वडील पत्नी या सगळ्यांना तो गावी ठेवून दुचाकीवरून मुंबईकडे निघाला होता. पण दुर्दैवाने संदेश चा प्रवास अखेरचा ठरला. संदेश याच्या अपघाताचे वृत्त करतात वडाळा गणेश नगर परिसरातील मित्रांना धक्का बसला. संदेश हा मुंबई वडाळा येथील यश गोविंद पथकात सहभागी होत असे. मुंबई येथील नोकरी सांभाळून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. संदेश घाणेकर त्याच्या अपघाती मृत्यूने सावर्डे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. वाकण रोहा येथील पोलीस हवालदार निलेश गव्हाणकर यांनी या अपघाताची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नागोठणे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे जी.एम. भोईर अधिक तपास करत आहेत.