मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील सात विद्यार्थ्यांसह तीन प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड

रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जागतिक बँक अनुदानित व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संचलित राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी नजीकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील सात विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक यांची थायलंड येथील चुलालॉकॉन युनिव्हर्सिटी येथे मत्स्य आणि मत्स्य संवर्धन या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आलेली आहे. पैकी सात विद्यार्थी एक महिन्याकरिता आणि एक प्राध्यापक पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता थायलंडला रवाना झालेले आहेत. उर्वरित दोन प्राध्यापक पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता पुढील आठवड्यात रवाना होणार आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता यांच्या प्रयत्नाने सदर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामध्ये मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी संधी प्राप्त झालेली आहे.

या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामध्ये एकूण सात विद्यार्थी व तीन प्राध्यापक सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. प्रकाश शिंगारे, डॉ. अनिल पावसे आणि डॉ. बाळासाहेब चव्हाण तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वप्निल जाधव, देव रंजनी, रोहित आपटे, अमरेंद्र कुमार, प्राची डोंगरकर, विराज दवंडे आणि गार्गी पालेकर हे सहभागी होणार आहेत.

सदर प्रशिक्षणादरम्यान मत्स्यसंवर्धनामध्ये अग्रेसर असलेल्या थायलड देशातील मत्स्यसंवर्धनाच्या विविध पद्धतीमधील संशोधनाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या कोकणासह राज्यातील मत्स्य शेतकऱ्यांना कसा करता येईल यावर विचार मंथन होणार आहे..

या विद्यार्थ्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम कुलगुरु परिषद दालनात झाला कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भावे म्हणाले विद्यार्थ्यांनी थायलंड येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणातून उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा फायदा कोकणासह राज्यातील मत्स्य शेतकऱ्यांना कसा कसा होईल याकडे लक्ष देऊन शाश्वत मत्स्य शेती होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान केले.

या कार्यक्रमादरम्यान संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिंगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवनेकर व डॉ सुरेश नाईक यांच्यासह विद्यापीठातील सर्व सहयोग अधिष्ठाता आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.