रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी येत आहेत. त्यामुळे कोकणात येणाऱ्या एसटी बससह खासगी वाहनांची प्रवासी वाहतूक हाऊसफुल्ल झाली. त्यात एसटी महामंडळाने तीन हजारहून अधिक जादा बस गाड्या कोकणात पाठवल्या. त्यामधून चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे दहा तासांचा प्रवास सोळा तासांवर गेला.
नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे भागांत असलेले कोकणवासीय गणेशोत्सव काळात कोकणातील गावी येतात. त्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी मुंबई ते कोकण मार्गावर तीन हजार जादा बस गाड्या सोडल्या. यातही निवडणूका जवळ आल्याने काही नेत्यांनी एसटी महामंडळाकडून सातशेवर बसेस प्रासंगिक करारवर घेतल्या. त्या गाड्यातून कोकणवासीयांना मोफत प्रवास देण्यात आला . त्याचे पैसेही संबधित पक्षीय नेत्यांनी एसटीकडे भरले . त्यामुळे मुंबईतून सांवतवाडीसाठी ६५० रुपयेपर्यंतचे तिकीट भाडे एसटी महामंडळाला मिळते. त्यामुळे एसटी महामंडळानेही राज्यभरातील विविध आगारांतील गाड्या कोकणच्या सेवेत सोडल्या आहेत. त्यातही जिल्ह्यांतर्गंत प्रवासाच्या एसटी बस कोकणकडे दिल्या आहेत.
पुण्यातून कोकणात येणारे अनेकजण आहेत. पुण्यातून सुटलेल्या गाड्या कोल्हापूरमार्गे कोकणात येतात. त्या गाड्यांनाही गर्दी आहे. तर प्रवाशांची वाढती संख्या पाहून खासगी आराम बसही पुणे-पणजी, सावंतवाडी, रत्नागिरी मार्गावर सोडल्या आहेत. त्यालाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.