चिपळूण:- मुंबई- गोवा महामार्गावरील सावर्डे येथे अंधेरी येथून दुचाकीवरुन गावाकडे येणाऱ्या दोन तरुणांचा अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे येथे दुचाकीचा मोठा अपघात झाला आहे.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गावर असलेल्या दुभाजकावर दुचाकी आदळून यामध्ये दुचाकी चालक सौरभ सुरेश शिगवण (वय २३) या युवकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
या दुचाकीवर मागे सौरभ याचा मित्र देवेंद्र सुरेश रावणंग (वय २१ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. कर्ली, ता. संगमेश्वर) हाही मुंबई अंधेरी येथून गावी येत होता. यावेळी त्याचा मागे बसलेला मित्र देवेंद्र हा सुदैवाने बचावला आहे. ऐन गणेशोत्सवात साडवली संगमेश्वर येथील शिगवण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रविवारी सकाळी ०५:३० वाजताच्या सुमारास देवेंद्र आणि त्याचा मित्र सौरभ दोघे दुचाकी घेऊन चालले होते. होंडा- कंपनीची मोटार सायकल गाडी (नं. एम एच ०८ / अ ७/ ८३१०) घेऊन ते निघाले होते. मौजे असुर्डे बनेवाडी खिंड या ठिकाणी रविवारी ११.४५ वाजता ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना महामार्गावर असलेल्या लोखंडी पत्र्याच्या डिव्हाईडरला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात हे दोघेही तरुण मोटरसायकल वरून उडाले. यावेळी सौरभ लोखंडी डिव्हार्डरच्या मध्यभागी पडला त्या अपघातात सौरभ याच्यावर डोक्याला आणि अन्यत्र गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यावेळी महामार्गावर असलेल्या रुग्णवाहिकेने सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सौरभला तात्काळ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सौरभ याला तपासून मृत घोषित केले.