रत्नागिरी:- येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची 24 फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. या शिवसृष्टीमुळे येथील पर्यटनालाही चालना मिळणार असून शनिवारी सकाळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व अधिकार्यांना सूचना केल्या.
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने विचार करुन पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीसह छत्रपतींचा ईतिहास नजरेखालून घालता येणार आहे. या शिवसृष्टीमध्ये 24 फूट उंच छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही शिवसृष्टी रत्नागिरीकरांचे गौरवाचे एक स्थान बनेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
शनिवारी सकाळी शिवसृष्टीच्या सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली व त्यांनी ठेकेदार व अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी नगर पालिकेचे मुख्याध्याधिकारी तुषार बाबर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
याचवेळी पर्यटनवाढीच्या दृष्टीने रत्नागिरी शहराजवळील भाट्ये समुद्रकिनार्याचा पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी पावस मार्गावरील भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असून, पर्यटकांना जास्तीतजास्त सुविधा देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाट्ये प्रमाणेच मार्लेश्वर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आराखडा तयार केला जात असून त्यासाठीही 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
शहरातील थिबा पाँईट येथील राजमाता जिजामाता उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तर पर्यटनाचा विचार करुन शहरामध्ये भव्य अशी विठोबाची मूर्ती उभारण्याचा निर्णय झाला असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.