राजापूर:- राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षे युवकाने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार असे या युवकाचे नाव आहे.
राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी येथे राहणारा ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते. त्या दारूच्या व्यसनावरून 6 ऑगस्ट रोजी त्याचे रात्री नऊ वाजल्यानंतर उशिराच्या सुमारास घरी वडिलांजवळ भांडण झाले. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने टोकाचे पाऊल उचलत रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली.
अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मदत करून तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले. ऋषिकेश हा लाँचवर मासेमारीसाठी काम करायचा अशातच आपल्या घरातील मुलाने आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई येथील नायर रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याने नायर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अवघे 22 वर्षे वय असलेल्या या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या प्रकाराची नोंद मुंबई येथून राजापूर पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.