समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील लावणीची कामे पूर्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने लावणीची कामे पूर्ण झाली. शासनाकडून खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार खतांचा पुरवठा झाला असून, शेतकर्‍यांकडून खताची उचलही झाली आहे.

मुसळधार पाऊस झाल्यानंतर लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. भाताचे उत्पन्न चांगले यावे, यासाठी लावणी सुरू असताना आणि झाल्यानंतर खताची मात्रा दिली जाते. तसेच आंबा, काजू, नारळ आणि इतर झाडांना खते देतात. पाऊस सुरू होताच शेतकर्‍यांनी खत विक्री केंद्रातून खत खरेदी करण्यास सुरवात केली होती.सर्व तालुका खरेदी-विक्री संघाकडे शासनाकडून खत पुरवठा होतो. तेथून ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्यांना खत विक्रीसाठी पाठवले जाते.

जिल्ह्यात साडेपाचशे विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. त्यांना खतपुरवठा केला जातो. तालुका खरेदी-विक्री संघात खतांची विक्री सुरू आहे. तालुक्यातील शेतकरीही येथून खत घेऊन जात आहेत. खरेदी-विक्री संघाकडे खरीप हंगामासाठी 9650 मेट्रिक टन खत आले होते. त्यामुळे यावर्षी एकूण दहा हजार मेट्रिक टन खतविक्रीसाठी उपलब्ध होते.
यातील 9 हजार मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. खरेदी -विक्री संघात यावर्षी युरिया, सुफला, 15-15-15, 18-18-10, 10-26-26, एसएसपी पावर, दाणेदार, कोकण सम्राट, शास्वत, प्रोटोमॉल असे खत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शासनाकडून मिळालेल्या सुचनेप्रमाणे, खतांची विक्री सुरू आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.