जिल्ह्यात 8, 412 शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात विमा

रत्नागिरी:- हवामानातील बदलांचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या पंतप्रधान पिकविमा योजनेत रत्नागिरी जिल्ह्यातील भातपिकाचा 8,106 तर नाचणीचा 306 असा मिळून 8, 412 शेतकर्‍यांनी एक रुपयात विमा उतरवला आहे. गतवर्षी 3 हजार 200 शेतकर्‍यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता.

पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकर्‍यांना भरावी लागत होती; मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा योजना शासनाने जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भात आणि नाचणी या दोन पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भातासाठी हेक्टरी 50 हजार तर नागलीसाठी 20 हजार विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. सध्या भातलावणी
ची कामे सुरू असल्यामुळे विमा उतरवण्यासाठी शेतकर्‍यांना वेळ मिळालेला नव्हता. गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत होते. परिणामी, शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही पिकांचे मिळून 8 हजार 412 शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे 2202.14 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. जिल्ह्यातून 10 कोटी 81 लाख रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे.