कोकणातील वानर, माकडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे; बागायतदारांच्या बैठकीत ठराव

रत्नागिरी:- गेल्या 30 वर्षांत वानर, माकडांची संख्या १०० पटीने वाढली आहे. शेती, बागायतीचे उत्पन्नच मिळाले नाही तर कोकणात शेतकरी जगू शकत नाही. या वेळी वानर, माकडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, असा एकमुखी ठराव आज शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या संबंधीचा ठराव १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत करून ते शासनाकडे पाठवण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला तसेच पावसाळी अधिवेशनात यावर तोडगा काढा अन्यथा महिन्याभरात साखळी उपोषण करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कायद्याचे भय दाखवू नका. कायदा जनतेसाठीच आहे. त्यामुळे सुरक्षित व भयमुक्त शेतीचा आमचा अधिकार आहे तो मिळावा याकरिता शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला. वानरांचा बंदोबस्त करा अन्यथा महिन्याभरात उपोषणाला बसू, असे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व वन विभागाला सर्व शेतकऱ्यांनी वैयक्तिक नेऊन दिली. गोळप येथील अविनाश काळे यांनी गतवर्षी वानर, माकडांच्या बंदोबस्तासाठी उपोषण केले. त्यानंतर माकडांचा प्रश्न विधानसभेत पोहोचला. त्यावर समितीही गठित झाली; मात्र निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला २०० हून अधिक शेतकरी, आंबा बागायतदार उपस्थित होते. या वेळी काळे म्हणाले, पूर्वी वानरांची शेपटी दाखवा ५ रुपये मिळवा अशी शासनाची योजना होती; परंतु नंतर कायदे आले व वानरांना संरक्षण मिळाले. परंतु ३५ वर्षांत वानरांची संख्या १०० पटीने वाढली आहे. कोणतीही शेती करण्यास शेतकरी घाबरतात, ही गोष्ट शासनाला कळत नाही. आमच्याकडे तक्रारी येत नाहीत, असे शासनाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे प्रत्येक गावातून समस्यांची निवेदने पाठवली पाहिजेत. शेती करता येत नसल्याने उत्पन्न मिळत नाही, ही शासनाचीच जबाबदारी आहे. नुकसानभरपाई हा इलाज नाही. वानरांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आम्ही नुकसानभरपाई मिळण्याकरिता शेती करत नाही. समितीच्या अहवालात माकडांची नसबंदी तसेच माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्याच्या शिफारशी आहेत; परंतु याचा काहीही उपयोग नाही. या प्रसंगी सचिन काळे, दिलीपकुमार साळवी, विनायक ठाकूर, दशरथ रांगणकर, सुधीर तेंडुलकर, रवींद्र भोवड यांनी मनोगत व्यक्त केले.