दापोली:- येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते सांगून निघालेल्या नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला किंवा तीने आत्महत्या केली किंवा कसे हे गुढ अद्याप कायम आहे.
दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन लावला त्यावेळेला तिने नीलिमा मी गावी ओमळी येथे जाते आहे असे सांगून निघाली आहे अशी माहिती दिली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेड असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तिच्या घरच्यांनी चिपळूण परिसरातही नीलिमा हिची शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही
दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी कर्मचारी निलीमा सुधारकर चव्हाण (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) या शनिवार दि. २९ जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ती मैत्रिणीला सांगून दापोली शहरा जवळ असलेल्या जालगाव लष्करवाडी येथून येथून निघाली होती. शनिवारी दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा ती नेहमी आपल्या गावी जात असे इतकेच नव्हे तर २८ जुलै रोजी शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून मी सकाळी गावी येणार आहे असेही कळवले होते. या सगळ्या प्रकारामुळे चिपळूण व दापोली तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपला भाऊ अक्षय याच्या जवळ मी उद्या सकाळी घरी येत आहे हे घरच्यांजवळ झालेले बोलणे हे दुर्दैवाने अखेरचे ठरले.
एक ऑगस्ट रोजी मंगळवारी युवतीचा मृतदेह मिळाला. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या नीलिमा हिचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दाभोळ खाडी परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच तात्काळ दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ, सागर कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आकस्मिक मृत्यू अशी नोंद दाभोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास दाभोळ व दापोली पोलीस करत आहेत.