ठाकरे सेनेची बीडीओंवर आगपाखड; विकास कामात डावलल्याचा संताप
रत्नागिरी:- तालुक्यातील ग्रापंचायतींचा विकास आराखडा तयार करताना सरपंचांना विश्वासात घेतले जात नाही. परस्पर काम ठरवली जात आहेत. शिंदे गटाच्या सरपंचांची कामे होतात. आम्हाला फक्त मान दिला जातो, कामं दिली जात नाहीत. तुम्ही मंत्र्यांच्या दाबावाखाली काम करत आहात, हे चालणार नाही. तुम्ही शासकीय अधिकारी आहात की, मंत्र्यांचे कामगार अशी आगपाखड ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि सरपंचांनी गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यावर केली.
रत्नागिरी तालुक्यात ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व आहे. ९४ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती ठाकरे सेनेकडे आहेत तर अनेक शिंदे गटाकडे आहेत. ठाकरे सेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना निधी आणि विकासकामे मिळत नसल्याने संतापलेल्या ठाकरे सेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली आज पंचायत समितीवर धडकले. गटविकास अधिकारी जाधव यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले. या वेळी प्रमोद शेरे, शेखर घोसाळे, आबा घोसाळे, महेंद्र झापडेकर, राकेश साळवी, महिला पदाधिकारी आणि सरपंच आदी उपस्थित होते. १४वा आणि १५व्या वित्त आयोगातील विकास आराखड्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी मागविली. विकास आराखडा तयार करताना सरपंचांना का विश्वासात घेतले जात नाही. केबिनमध्ये बसून पसरस्पर कसा आराखडा तयार केला जातो? २०२२-२३ चा विकास आराखडा आम्हाला दाखवा. त्यात आमच्या सरपंचांना किती कामे दिली आहेत ते दाखवा. यावर गटविकास अधिकारी जाधव म्हणाले, गेल्या वर्षीच्या आराखड्याला निधीच आला नसल्याने तो ब्लॅक आहे. पंचायत समिती सेसफंड आणि १४ वित्त आयोगातून कामे घेतली. तुम्ही सरपंचांना विश्वासात घेतले नाही ना मग गेल्या वर्षीचा आराखडा रद्द करा, अशी मागणी ठाकरे सेनेने केली. मागणी नसताना फणसवळे ग्रामपंचायतीची कामे घेण्यात आली. गावात रस्त्याची कामे होत असली तरी सरपंचांना त्याची कल्पना नसते. परस्पर मापं घेऊन ही कामं होत आहेत, हे चालणार नाही. उदय बने सोडले तर अन्य कोणत्याही ठाकरे सेनेच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीला निधी किंवा विकासकामे दिलेली नाहीत. मंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. तुम्ही शासकीय अधिकारी आहात की, मंत्र्यांचे कामगार, असा संतप्त सवाल विभाग प्रमुख शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला.
टिके गावाच्या दिलेल्या दहा कामांपैकी एकही काम आम्हाला दिलेले नाही. काही आराखड्यातील कामांची वर्कऑर्डर निघाली, कामे झाली, त्यांना बिलपण दिले. तुम्ही काय सांगताय? मी तुम्हाला किती उदाहरणे दाखवू, असे साळवी यांनी जाधव यांना प्रतिउत्तर केले. यापुढे अशा प्रकारे विकासकामांमध्ये मतभेद चालणार नाही. तुम्ही अधिकारी म्हणून चांगले काम करा, असेही ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ऐकवले.