रत्नागिरी:- पावसमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांविरोधात पूर्णगड सागरी पोलिसांनी मोहीम उघडली . पावस चौकामध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यामध्ये अनेकजण सापडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. चारचाकी गाड्यांची अग्रक्रमाने तपासणी करण्यात आली.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सागरी मार्ग असल्याने त्याचबरोबर परिसरातील मुख्य ठिकाण असल्याने अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनचालक नियमांचे पालन न करता वाहने चालवत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर आळा बसावा व नियमांचे पालन करून सुरक्षितपणे वाहने चालवावी यासाठी पावस चौकामध्ये पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. पावसाळा असल्याने अनेकजण पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. गटारीच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून व मद्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी केली. प्रामुख्याने पोलिसांकडून चारचाकी गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. दुचाकीवर नियमांचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली जात होती. अनेकांकडे कागदपत्रे व हेल्मेट नसल्याने तारांबळ उडाली .