संगमेश्वर:- नदीत खेकडे पकडण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला. खेकडे पकडण्यासाठी नदीवर गेला असताना बंधाऱ्यावरून पाय घसरून नदीत पडून मृत्यु झाला.
घटना नजीकच्या साडवली येथे शनिवारी रात्री घडली. साडवली एकता नगर येथील राजेंद्र दत्ताराम मणचेकर (वय २९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजेंद्र हा त्याचे मामा संतोष गेल्ये यांच्यासोबत शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास साडवली येथील नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी उतरला होता.
नदीतील बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरला अन नदीत पडला. काळोख असल्याने व नदीला खोल पाणी असल्याने राजेंद्र पाण्यात बुडाला. सदर बाब संतोष गेल्ये यांनी देवरुख पोलीस व ग्रामस्थांना कळीत केली. यानुसार पोलीस व ग्रामस्थ यांनी रात्री राजेंद्रचा शोध सुरु केला.
रविवारी सकाळी ६.३० वा. राजेंद्र चा मृतदेह नदीपात्रात मिळून आला. देवरुख ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच राजेंद्रच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.
राजेंद्रचा विवाह झाला असून पत्नी त्याच्यासोबत रहात नव्हती. राजेंद्र हा मजुरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस डी. एस. पवार करीत आहेत. दरम्यान या घटनेची नोंद अकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.