महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना: नाना पटोले

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे, समृद्ध महामार्गावरची घटना भयानक होती, एकीकडे प्रेतं जळत होती आणि दुसरीकडे राजभवनात जयघोष चालू होता. राज्याच्या इतिहासातला हा काळा दिवस असून, यांना पाप करायचं होतं तर दोन चार दिवस मागे पुढे करायला हवं होतं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

राज्याच्या राजकारणातील आणखी एक महानाट्य रविवारी राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय 8 जणांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रत्नागिरी दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपचे कृत्य सर्वाना कळलेले आहे. भाजपने 2 भाग पाडलेले आहेत. भय आणि भ्रष्टाचार त्या माध्यमातून घाणेरडे कृत्य ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केले जात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जे पाप घडले आहे. त्याचे परिणाम भाजपला येणाऱ्या काळात भोगावे लागतील. महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

दरम्यान जे कोणी काँग्रेसबरोबर उभे असतील त्यांना सोबत घेऊन चालू, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमध्ये या भटजी लोकांनी त्या पद्धतीचे कार्य केलेले आहे. हे आता सर्वांना कळत आहे. भटजींचे राजकारण काय असते हे जनतेला कळलेले आहे, अशी देखील टीका नाना पटोले यांनी भाजपवर यावेळी केली. तसेच देशातील सरकारने संविधांनिक व्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी ही कायम राहील. विरोधी पक्षनेते संदर्भात बसून निर्णय होईल, आत्तापासून आततायीपणा राष्ट्रवादीने करू नये असा सल्ला देखील नाना पाटोले यांनी यावेळी दिला. तसेच 48 लोकसभा आणि 288 विधानसभा यांची चाचणी काँग्रेस करत आहे. महाराष्ट्रातील मूळ पक्ष काँग्रेसच, ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहोत. तसेच मित्रपक्षाला सुद्धा ताकद देण्याचे काम आम्ही करू असं नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान काँग्रेस पक्षात कुठली भीती नाही, त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. आमच्या पक्षात फूट पडेल असं मला वाटत नाही असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले. निसर्गाचे नुकसान असेल तिथे प्रकल्पाचे समर्थन काँग्रेस करणार नाही. कोकणातल्या निसर्गाला धोका पोहोचवून आम्ही कधीच रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करणार नाही असे नाना पटोले यावेळी म्हणाले.