महिलेवर अत्याचार प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी

दापोली:- राज्यात महिलावरील अत्याचारात वाढ होत असताना त्याचे लोण दापोली तालुक्यातही आले असून दापोली शहराजवळील एका गावात एका ५७ वर्ष महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला दापोली पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील एका गावातील एका ५७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेकडे गुरुवार ता.२९ जून रोजी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास वाडीतीलच मनीष गोवले हा तरुण केस पुसण्यासाठी टॉवेल मागण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी आला व त्याने आतून दाराला कडी लावली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला. यावेळी पीडिता ओरडू लागली, मात्र त्या तरुणाने तिच्या तोंडावर हाताने दाबून धरले तसेच पिडीतेच्या डोक्यावर हाताने मारले. यावेळी झालेल्या झटापटीत पिडीतेच्या डोळ्याला मार लागला. झालेला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने यावेळी पीडीतेला दिली.

पीडितेच्या तक्रारी नुसार दापोली पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकतपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करीत आहेत.