हॉटेलचे बिल भरण्यास नकार दिल्याने तिघांनी एकावर केले वार; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला सहा हजार रुपये बील देण्यासाठी सांगितले . फिर्यादीने बिल देण्यास नकार दिला . याचा राग मनात धरून तीन संशयितांनी कोयत्याने व ब्लेडने वार करून दुखापत केली . या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मारहाणीची ही घटना बुधवार २८ जून रोजी रात्री १० वा . मारुती मंदिर जवळील शुभम हॉटेलमध्ये घडली आहे . शरद तातोबा नार्वेकर , अन्वर अली गोलंदाज , सुनील वसंतराव जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत . त्यांच्याविरोधात फिर्यादीने ( पोलिसांनी नाव जाहीर केले नाही ) दिलेल्या तक्रारीनुसार , बुधवारी रात्री फिर्यादी हे शुभम हॉटेल येथे जेवण पार्सल घेण्यासाठी गेले होते . त्यावेळी संशयित तिथे जेवत होते . त्यांनी आपल्या जेवणाचे ६ हजार रुपये बिल फिर्यादीला देण्यास सांगितले त्यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला . याचा राग मनात धरून संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून हातापायाने मारून कोयत्याने व ब्लेड मारून दुखापत केली . या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली . तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.