शीळ नदीवरील जुन्या झालेल्या पुलाचा स्लॅब धोकादायक

रत्नागिरी:- मजगावपासून अनेक गावांना जोडणार्‍या शीळनदीवरील जुन्या झालेल्या पुलाचा स्लॅब ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ढासळू लागल्याने हा पूल वाहतुकीला धोकादायक बनला आहे.

रत्नागिरीतील मजगाव ते करबुडे, फणसवळे गावांना जोडणारा शीळ नदीवरील पुलाला मोठे खड्डे पडले होते. या पुलावर महिनाभरापूर्वीच डांबरीकरणही करण्यात आले. त्यामुळे येथील रस्ता आता एकदम गुळगुळीत झाला आहे. शीळ नदीवरील या पुलाला अनेक वर्ष झाली आहेत. या पुलाप्रमाणेच मिरजोळे पाटीलवाडीतील पूलही यावर्षी नव्याने बांधण्यात आला. परंतु शीळ येथील पुलाचे काम घेण्यात आले नाही.

या पुलाचा स्लॅब निखळला असून, त्याच्या लोखंडी सळ्याही दिसू लागल्या आहेत. लोखंडी शिगांसह काही भाग पुलाखाली लोंबकळत आहे. या पुलावरुन मोठ्याप्रमाणात गाड्यांची वाहतूक सुरु असते. रत्नागिरीतून गणपतीपुळे, जयगड, खंडाळा व गुहागरला जाणारे प्रवासी करबुडेमार्गे जवळचा मार्ग म्हणून या पुलावरुन प्रवास करतात.
नुकताच पाऊस सुरु झाला असून, या पुलाच्या वरील बाजुला असणारे धरण भरल्यानंतर सांडव्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो. त्याचप्रमाणे साखरतर खाडीत भरतीचे येणारे पाणीही या पुलापर्यंत येत असते. त्यामुळे पुलाला लागून पाणी वाहत असते. काहीवेळा मोठ्यापावसात पुलावरुनही पाणी जात असते. त्यामुळे पावसाळ्यात हा पूल धोकादायक ठरणार असून, बांधकाम विभागाने यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.