रत्नागिरी:- जिल्हा शासाकिय रुग्णालयामध्ये प्रसुती विभागात कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी नसल्याने ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देत सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरले. तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकिय अधिकारी नेमण्याच्या आश्वासानानंतर आ. साळवी कुलूप न ठोकताच मागारी फिरले. तर ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर लगेच पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या आदेशाने स्रीरोग तज्ञ डॉ.विनोद सांगविकर यांची जिल्हा रुग्णालयात कामगिरीवर नियुक्ती करण्यात आल्याचे जाहिर केले. मात्र प्रत्यक्षात डॉ.सांगविकर यांना रत्नागिरी नियुक्तीचे आदेश अध्याप निघालेले नाहीत. तर दोन दिवसांपुर्वी भाजपाचे जिल्हा प्रभारी प्रमोद जठार यांनी ही ना.सावंत यांच्या आदेशाने डॉ.सांगविकर रत्नागिरीत येणार असल्याचे जाहिर केले.मात्र या तीन्ही पक्षांच्या घोषणेनंतर जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागातील महिलांचे हाल कायम राहिले आहेत. डॉ.सांगविकर येणार केव्हा ? असा प्रश्न आता प्रसुतीसाठी येणार्या महिलांचे नातेवाईक विचारत आहेत.
सोमवारी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपल्या शिवसैनिकांसह जिल्हा रुग्णालयात ठाण मांडले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांना धारेवर धरले. त्यांनी आपल्या अधिकारात डॉ. सानप, डॉ. कांचन मदार यांची तात्पुती नियुक्ती जिल्हा रुग्णालयात केल्याचे सांगितले. तर याच वेळी आ.साळवी यांनी पालकमंत्री यांच्याशी संपर्क करुन डॉ.विनोद सांगविकर यांची प्रतिनियुक्तीवर रत्नागिरीत बदली करण्याची विनंती केली. त्यानंतर ना.सामंत यांनी याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करुन आदेश काढले जातील असे सांगितले.आ.राजन साळवी यांनी आपले रुग्णालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे घेतले. ते टाळे न ठोकताच निघून गेले.
तर आ.राजन साळवी रुग्णालयातून बाहेर पडताच पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडून पोस्ट व्हायरल करण्यात आली. जिकडे प्रश्न गंभीर तिकडे रत्नागिरीचे पालकमंत्री खंबीर अशी पोस्ट व्हायरल करुन पालकमंत्री ना.सामंत यांनी थेट आ.राजन साळवी यांना डिवचल्याची चर्चा मतदार संघात सुरु आहेेे. आपल्याच प्रयत्नांमुळे जिल्हा रुग्णालयात प्रसुती तज्ञ उपलब्ध होणार असल्याचा दावा ना.सामंत यांनी केला आहे.
तर भाजपचा जिल्हा प्रभारी प्रमोद जठार यांनी आपल्याच प्रयत्नांमुळेच डॉक्टर येणार असल्याचा दावा दोन ते तीन दिवासांपुर्वी केला होता. पालकमंत्री, आमदार, माजी आमदार डॉक्टर आणण्याची घोषणा गेले काहि दिवस करत आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र डॉ.विनोद सांगविकर यांना अध्याप शासनाचे कोणतेच आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल थांबणार केव्हा असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.