जिल्ह्यात आऊटसोर्सिंगने सातशेहून अधिक शिक्षक भरणार

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने 11 महिन्यासाठी आऊटसोर्सिंगने सातशेहून अधिक शिक्षक भरले जाणार आहेत. त्या गावातील स्थानिकांना यात प्राधान्य दिले जाणार असून त्यांना 9 हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातून 627 शिक्षकांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात झाल्यामुळे अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. शिक्षक भरतीचा विषय न्यायालयात गेला आहे, काही शिक्षकांनी आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. तालुक्यातून अन्य तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना पहिल्या शाळांमध्येच किंवा अन्य दोन शाळांपैकी एका शाळेत पुन्हा रुजू करुन घ्यावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 700 ते एक हजार शिक्षक आऊटसोर्सिंगवर 11 महिन्यांसाठी भरले जाणार आहेत. पाच हजार ऐवजी नऊ हजार रुपये त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 10 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. ग्रामपातळीवरच या शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये डीएड, बीएड, 65 वर्षाआतील निवृत्त शिक्षकांचा विचार केला जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. ही भरती तातडीने केली जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील अनेक शासकीय कर्मचार्‍यांची मेडीकल बिले प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्ष ही बिले शासकीय लालफितीत अडकून पडली आहेत. जिल्ह्याच्या पुढील दौर्‍यात सकाळी 9 ते 12 यावेळेत सर्व अधिकार्‍यांना घेऊन, योग्य बिले मंजूर केली जातील. यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वैद्यकीय बिले प्रलंबित असणार्‍यांनी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.