कॉलेज युवती सोबत गैरवर्तन करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकाला पोलिस कोठडी

रत्नागिरी:- भर दिवसा रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला आज गुरुवारी न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अविनाश म्हात्रे ( ३५ , रा.शांतीनगर , रत्नागिरी ) असे संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे . ही घटना मंगळवार १३ जून रोजी जयस्तंभ ते कुवारबावकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती . मंगळवारी दुपारी एक १८ वर्षीय तरुणी एकटीच अविनाशच्या रिक्षामधून आपल्या घराकडे जाण्याकरिता प्रवास करत असताना त्याने प्रवासा दरम्यान या तरुणीसोबत असभ्य व अश्लील वर्तन केले.

या तरुणीने मोठया हुशारीने या रिक्षाचा अचूक नंबर लिहून घेतला तसेच सोशल मिडीयावर पोस्ट करून मदतीची साद घातली व घडलेल्या घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्याचा शोध घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली . आज गुरुवारी अविनाशला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी रविवारपर्यंत पोलिस कोठडीत केली.