गणपतीपुळेत प्रचंड वाहतूक कोंडीने पर्यटक हैराण

रत्नागिरी:- ऐन हंगामात सुरु असलेल्या कामांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांना दिवसातून एकदा तरी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पर्यटन आराखड्यात मंजूर झालेली कामे गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सध्या पाणीयोजना आणि गटारे यांची कामे सुरु आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातील पर्यटक गणपतीपुळे येथे दररोज येत असल्याने प्रचंड गर्दी आहे. चारचाकी, खासगी बस या मार्गावर येत असल्याने ही कोंडी होत आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागात पर्यटकांची ये-जा सुरु झाली आहे. शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्ट्यांमुळे पंधरा हजाराहून अधिक पर्यटक गणपतीपुळे होते. सोमवारी थोडी गर्दी कमी झाली असली तरीही दररोज बारा हजाराहून अधिक पर्यटक गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेऊन जात आहेत. बहूसंख्य पर्यटक खासगी बस, चारचाकी गाड्यांद्वारे फिरायला बाहेर पडतात. गणपतीपुळे येथे सध्या विकासकामे वेगाने सुरु आहेत. गटारे आणि पाणीयोजनेसाठी रस्त्यांच्या बाजूला खोदाई करण्यात आली होती. मंदिराकडे जाणार्‍या रस्ता आणि मुख्य रस्ता येथे ही कामे सुरु असल्याने वाहनांचे पार्किंग तिकिट नाक्याजवळ मोकळ्या जागेत केले आहे. निवासासाठी हॉटेलला जाणार्‍यांच्या गाड्या फक्त त्या मार्गे सोडल्या जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पोलिस आहेत. पण वाहनांचे गर्दी अधिक असल्याने त्यामधून मार्ग काढताना वेळ लागतो. दिवसातून एखाद्यावेळी याला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी (ता. 18) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोंडी झाली होती. पोलिसांनी तासाभरात वाहने मार्गी लावली. त्यामुळे पर्यटकांनीही निःश्‍वास सोडला.

दरम्यान, गणपतीपुळे येथे सुरु असलेली कामे उन्हाळी सुट्टया सुरु होण्यापुर्वी करावीत अशी मागणी स्थानिकांनी फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली होती. त्यानंतर ही कामे वेगाने पूर्ण केली असती तर आता रस्ते मोकळे राहीले असते. अरुंद रस्ते असल्याने यामधून दोन मोठ्या गाड्या नेताना कसरत करावी लागते. सध्या गणपतीपुळेमध्ये सांगली, कोल्हापूरसह सातारा येथील पर्यटकांची मोठ्याप्रमाणात गर्दी आहे. पुढील दोन दिवसात पुन्हा त्यात वाढ होईल असे व्यावसायीकांचे मत आहे.

गणपतीपुळे गावात सुरु केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी 6 फेब्रुवारीला एका पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यानंतरही कामे संथ गतीने सुरु राहीली. परिणामी हंगामात पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

  • प्रमोद केळकर, लॉजिंग व्यावसायिक