साताऱ्यात कारवाई रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी:- सातारा -पुणे बंगळुरू महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत टोयोटा शोरूमजवळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून रुग्णवाहिकेतून व्हेल माशाची उलटी घेऊन जाणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांमध्ये रत्नागिरीतील तिघांचा समावेश आहे. यात कासारवेली येथील मच्छीमार एक निवृत्त पोलीस कर्मचारी आणि अन्य एकाचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अंबर ग्रीस या उलटीची किंमत पाच कोटी 43 लाख दहा हजार रुपये इतकी आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना काही गोपनीय मुद्देमाल गुपचूप साताऱ्यातून नेला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्ग परिसरात सापळा रचला. महामार्ग परिसरातील टोयोटा शोरूमच्या समोर पुणे बाजूने सेवा रस्त्यावर एका रुग्णवाहिकेला अडवून पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. रुग्णवाहिकेची तपासणी केली. असता एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तपकिरी रंगाचा ओबडधोबड पदार्थ आढळून आला. वन विभागाच्या सहकार्याने या पदार्थाची तपासणी केली असता तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे स्पष्ट झाले. या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाच कोटी 43 लाख दहा हजार रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी सिद्धार्थ लाकडे (वय 31, रा. कासारवेली, जि. रत्नागिरी), अनिस इसा शेख (वय 38, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नासिर अहमद रहमान राऊत (वय 40, रा. भडकंबा, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी), किरण गोविंद भाटकर (वय 50, रा. भाटये, रत्नागिरी) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लाकडे रत्नागिरी येथील स्थानिक मच्छिमार असून त्याला ही उलटी आढळून आली. तर किरण भाटकर रत्नागिरी एलसीबीचा माजी पोलीस कर्मचारी आहे. तोच या प्रकरणातील मध्यस्थ असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस अधिक चौकशी करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. या चौघांवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम 1972 च्या 38, 43, 44, 45, 48 आणि 51 नुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.