वेरॉन कंपनीची रत्नागिरीतील मालमत्ता ईडीकडून जप्त

रत्नागिरी:- बँकांकडून कर्ज घेत तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणेस्थित वेरॉन समुहाची पुणे, नागपूर, रत्नागिरी, गोवा येथील १२ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. कंपनीचा आतापर्यंतच्या जप्तीचा आकडा १७९ कोटी २७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये रत्नागिरी एमआयडीसीतील वेरॉन कंपनीने खरेदी केलेला भूखंड ईडीने जप्त केला आहे.

कॅनरा बँकेसह आणखी काही बँकांकडून कंपनीच्या विस्तारासाठी कंपनीचे मृत झालेले प्रवर्तक एस. पी. सवईकर यांनी महाकाय कर्ज घेतले होते. कालांतराने हे कर्ज थकले; परंतु तरीही काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या रक्कमेचे लेटर ऑफ क्रेडिट मिळवले होते. या माध्यमातून कंपनीला जे पैसे मिळाले त्या पैशांचा वापर कंपनीने विस्तारासाठी न करता त्यातून काही प्रमाणात जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित पैसे अन्य ठिकाणी फिरवत वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने 3 गुन्हे दाखल केले होते. यातील आर्थिक व्यवहारांची मर्यादा पाहता गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
प्राथमिक तपासादरम्यानच, कंपनीने मनी लॉड्रिंग केल्याचे दिसून आल्यावर ईडीने १६६ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर अधिक माहिती प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी ईडीने कंपनीची आणखी १२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या जप्तीच्या कारवाईमध्ये नागपूर, पुणे, रत्नागिरी, गोवा येथील भूखंडांचा समावेश आहे.