रिफायनरी समर्थक हजारोंच्या उपस्थितीत घेणार उध्दव ठाकरे यांची भेट

मुख्यमंत्री असताना वेळ दिला नाही आता तरी वेळा द्यावा अशी मागणी: केशव भट

रत्नागिरी:- बारसू येथे येथील प्रस्तावित रिफायनरीला विरोध सुरु असून त्यांना भेटण्यासाठी येणारे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन, रिफायनरी समर्थनार्थ त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटच्यावतीने केशव भट यांनी सांगितले. हजाराेंंच्या संख्येने यावेळी समर्थक माजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

प्रस्ताविक रिफायनरीसाठी बारसू परिसरात सर्वेक्षण सुरु असून, काही नागरिक व संस्थांमार्फत त्याला विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे हे 6 मे रोजी बारसू परिसरात भेट देऊन विरोध करणार्‍या ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. काही संघटना स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरुन विरोधासाठी विरोध करीत आहेत. मुख्यमंत्री पदी असताना उध्दव ठाकरे यांनी केंद्र शासनाशी पत्र व्यवहार करुन, बारसू येथे रिफायनरीसाठी हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र आता ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे.
यासंदर्भात फार्डच्यावतीने रत्नागिरीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केशव भट यांच्यासह उद्योजक कौस्तुभ सावंत, ठाकूरदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केशव भट म्हणाले, नाणार वेळीही रिफायनरी समर्थकांनी तीन ते चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना भेट मिळाली नव्हती. यावेळी समर्थकांनी आपली बाजू राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे यांना भेटून मांडली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी वेळ दिला नव्हता.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे 6 रोजी बारसू दौर्‍यावर येत असताना, त्यांनी समर्थकांना भेट द्यावी व त्यांचीही बाजू समजावून घ्यावी असे स्पष्ट मत केशव भट यांनी व्यक्त केले. राजापूरसह जिल्ह्यातील 64 विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. शेकडोंच्या संख्येने समर्थक ठाकरे यांना भेटण्यासाठी बारसू परिसरात उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.