शोरुममधील वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी चालकाला सहा महिने कारावास

रत्नागिरी:- वाहन निष्काळजीपणे तसेच बेदरकारपणे चालवून शोरुममधील वाहनांचे नुकसान करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने बुधवारी ६ महिन्याचा सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी 2 वा. सुमारास आर. के. मोटर्स टि. व्ही. एस शोरुम एमआयडीसी मिरजोळे येथे घडली होती.

प्रशांत चव्हाण (२६, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 6 फेब्रुवारी रोजी प्रशांत आपल्या ताब्यातील वाहन (एमएच-४६ – एबी -०१०७) हे आर. के. मोटर्स टी. व्ही. एस शोरुम प्लॉट नं ४२ एमआयडीसी – मिरजोळे येथे लागलेली आग विझवून परत वाहन घेऊन रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता गाडीच्या उजव्या बाजूचा मागील दरवाजाचे झडप उघडे ठेवून गाडी निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवत घेऊन जात होता. तेव्हा या गाडीच्या दरवाजाच्या उघड्या झडपाची शोरुम-गोडावूनच्या भिंतीला धडक बसली होती. ही धडक इतकी जोरदार होती की, शोरुमच्या भिंतीचे चिरे व सिमेंटचे ब्लॉक गोडावूनमध्ये असलेल्या नवीन टीव्हीएस कंपनीच्या गाड्यावर पडले. यामध्ये नऊ गाड्यांचे नुकसान झाले होते.