बारसू आंदोलन ठिकाणी साहित्याची नासधूस करणाऱ्या 201 आंदोलकांवर गुन्हे

राजापूर:- राजापुरातील बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र होत आहे. या ठिकाणी आंदोलन करुन पोलिसांच्या साहित्याचे नुकसान करणा़ऱ्या 201 आंदोलकांवर राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल रोजी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक लोकांनी आंदोलन पुकारले. पेट्रोकेमिकल्स उद्योगासाठी असलेल्या माती सर्वेक्षण कामाच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या साहित्याचे आंदोलकांकडून नुकसान करण्यात आले. तसेच आंदोलकांकडून सर्वेक्षण कामाला अटकाव व विरोध करण्याचा प्रयत्न झाला. शिवाय गवताला आग लावणे, गैरकायदा जमाव करुन रस्ता अडवून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बारसू येथील एकूण 201 आंदोलकांवर राजापूर पोलीस ठाण्यात भादविकलम 143, 147, 149, 435, 186, 188 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.