रत्नागिरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलने बाजी मारली असून निवडणूक झालेल्या 14 जागांवर सहकारचे उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यात बाजार समितीत राजकीय पक्षांच्या पॅनेलवरून राडा होत असताना रत्नागिरीत सर्वपक्षीयांनी एकत्र येत निर्माण केलेल्या सहकार पॅनेलने एकहाती यश मिळवून राज्यातील सहकारात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
बाजार समितीच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. परंतु तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने 14 जागांवर निवडणूक झाली त्यापैकी तीन जागांवर गजानन पाटील, हेमंत माने, सुरेश कांबळे हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे 11 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.
बाजार समितीच्या 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात होते. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून सुरेश भिकाजी सावंत, अरविंद गोविंद आंब्रे, विजय वासुदेव टाकळे, नैनेश एकनाथ नारकर, मधुकर दिनकर दळवी, रोहीत दिलीप मयेकर, संदीप हनुमंत सुर्वे हे विजयी झाले.
ग्रामपंचायत सदस्य मतदारसंघातून ओंकार संजय कोलते, प्रशांत यशवंत शिंदे तर कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था महिला प्रतिनिधी मतदारसंघातून स्मिता अनिल दळवी, स्नेहल सचिन बाईत या विजयी झाल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे पालकमंत्री ना.उदय सामंत, आमदार शेखर निकम, आ.राजन साळवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजी चोरगे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, उद्योजक किरण सामंत आदींनी अभिनंदन केले आहे.