तीन दिवसांनी येणारी भरती त्या बार्जसाठी धोक्याची

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले बार्ज मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. मागील पंधरा दिवस या बार्जचा मुक्काम मिऱ्या किनारीच आहे. पंधरा दिवस उधाणाच्या लाटा बार्ज येऊन धडकत आहेत. मागील पंधरा दिवस बार्ज मिऱ्या किनारी सुरक्षित असले तरी तीन दिवसांनी येणाऱ्या अमावस्येच्या भरतीचा फार मोठा धोका या बार्जला आहे. अमावस्येची भरती आणि समुद्राचे उधाण या बार्जसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
 

3 जूनला कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले. या वादळापूर्वी शारजाला जाणारे एक बार्ज आश्रयासाठी भगवती बंदर येथे दाखल झाले. समुद्रात नांगर टाकून बार्ज उभे होते. मात्र वादळाने समुद्रात सुरू असलेले लाटांचे तांडव यामुळे बार्जचा नांगर तुटला आणि बार्ज भरकटले. 3 जुनला सकाळी आठ वाजता बार्ज भरकटत मिऱ्या किनाऱ्यानजिक दाखल झाले. भलेमोठे बार्ज किनाऱ्यानजिक आल्याने ग्रामस्थांनी किनाऱ्यावर गर्दी केली. यंत्रणा देखील मिऱ्या किनारी दाखल झाली. मात्र वादळी वारा आणि लाटांचा प्रचंड मारा यापुढे बचावकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर दुपारी बार्ज मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन आढळले. वादळाचा वेग कमी झाल्यानंतर बार्ज किनाऱ्यावर स्थिरावले. यानंतर बार्जवरील 13 क्रू मेम्बर्सना बाहेर काढण्यात आले तर बार्ज दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मागील पंधरा दिवस बार्ज मिऱ्या किनाऱ्यावर मुक्कामी आहे. या कालावधीत समुद्रातील उधाणाच्या लाटांचा मार या बार्जने सहन केला. या कालावधीत बार्ज सुरक्षित राहण्यासाठी बांधण्यात आलेले दोरखंड देखील तुटले होते. बार्ज च्या सुरक्षेसाठी हे दोरखंड पुन्हा बांधण्यात आले. 

सद्यस्थितीत बार्ज सुरक्षित असले तरी तीन दिवसांनी येणाऱ्या भरतीचा मोठा धोका बार्जला आहे. 21 जूनला अमावस्या आहे. याच दिवशी कांकणाकृती सूर्यग्रहण देखील आहे. याचा परिणाम समुद्राला येणाऱ्या भरतीवर होऊ शकतो. या दिवशी पाऊस आणि वारा असल्यास उधाणाच्या लाटांचा धोका बार्जसाठी आहे. पाच वर्षांपूर्वी मिऱ्या किनाऱ्यावर आलेले श्री जॉय बार्ज अशाच उधानात पुन्हा वाहून गेले. यानंतर या बार्जचे पूर्णतः नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर पुढील 2 दिवसात बार्ज मिऱ्या किनाऱ्यावरून हलवण्याची तयारी संबंधीत कंपनीकडून केली जाण्याची शक्यता आहे.