जातीवाचक शिवीगाळ प्रकरण; चौघांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

आरोपींना अटक करा नाहीतर रस्त्यावर उतरु: रोहित तांबे

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील बौद्ध तरुणाला मारहाण प्रकरणातील चौघा आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा रोहित तांबे यांनी दिला आहे.

देवरुख नजीक साडवली येथे दि. ४ एप्रिल रोजी एका बौद्ध तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. यामधील संशयित आरोपी राजकुमार डोंगरे ,शुभम धणे, निखिल मोहिरे आणि श्रेयस मोरे या चौघांविरोधात जातिवाचक शिवीगाळ व जीवघेणी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपींकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता व समाजातील शांतता भंग होऊ नये तसेच आरोपींकडून यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी या कारणांमुळे त्याचा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळून लावला आहे. आरोपींच्या अटकपूर्वक जामीना विरुद्ध जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रफुल साळवी व फिर्यादी कडून ॲड. शिवराज जाधव यांनी जामीन नाकारण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला.
दरम्यान अटकपूर्व जामिन नाकारल्याचे समजताच संशयित आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कोकण प्रदेश संघटक रोहित तांबे यांनी केली आहे. तसे न घडल्यास रिपाइं सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रेमदास गमरे यांनी देखील आरोपींना अटक करून लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा इशारा वंचितचे संतोष जाधव यांनी दिला आहे.