तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कोंडगाव बाजारपेठ बंद

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे युवकावर झालेल्या तलवारीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कोंडगाव बाजारपेठ बंद ठेऊन हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.

भडकंबा येथील सागर महेश वैद्य (वय २४ रा. भडकंबा) याच्यावर हल्ला झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर तात्काळ रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यात एकूण तीन जखमी झाले असून अन्य दोघे कौस्तुभ शाहू जेधे (वय २० लांजा) व देवेंद्र संतोष हातंनकर (वय २४ रा. राजापूर) हे जखमी झाले. त्यांनाही रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले असून हे दोघे संशयित हल्लेखोरांचे निकवर्तीय असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार कोंडगाव येथे गेले तीन दिवस कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे दरम्यान काही बाचाबाची झाली होती. मात्र हा वाद तिथेच मिटवण्यात आला होता. मात्र संशयित आरोपीने मनात राग धरून मंगळवारी सायंकाळी सागर वैद्य याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण कोंडगाव बाजारपेठ आज बुधवारी बंद ठेऊन निषेध नोंदवत हजारोंच्या संख्येने जनता हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली होती. यावेळी ग्रामस्थांनी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करून पोलिसांना घेराव घालण्यात आला. सोळा तास उलटून गेले तरी आरोपींना अटक का नाही असा संतप्त सवाल जनतेने केला. आजचा निषेध मोर्चा न काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र ग्रामस्थांनी मोर्चा न काढता निषेध नोंदवला. जो पर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत साखरपा पंचक्रोशीतील जनता गप्प बसणार नाही, काल झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे साखरपा परिसरात
वातावरण तंग होते. रस्त्यावरील वाहतूक तुरळक होती बाजारपेठ कडकडीत बंद होती. कोंडगावमध्ये सध्या भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गुंडगिरी पोलिसांनी मोडीत काढली नाही तर जनता गप्प बसणार नाही असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला यावेळी साखरपा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे जनतेच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.