रत्नागिरी:- गतवर्षाच्या खरीप हंगाम अहवालानुसार भात उत्पादकतेत लांजा तालुका अव्वल ठरला आहे. नाचणीची सर्वाधिक उत्पादकता राजापूर तालुक्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्याचा 2021-22 या वर्षाचा आर्थिक समालोचन अहवाल जाहीर झाला असून, यामध्ये लांजा तालुक्यात 3 हजार 250 किलोग्रॅम प्रति हेक्टरी तांदळाची उत्पादकता आहे. त्या तुलनेत गुहागर तालुक्यात सर्वात कमी 2 हजार 413 किलोग्रॅम प्रति हेक्टर उत्पादकता आहे. नाचणीची सर्वाधिक उत्पादकता राजापूर तालुक्यात 3 हजार 37 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे. उद्योगक्षेत्राचा अभाव आणि उत्पन्नाचा प्रमुख मार्ग शेती असल्यामुळे लांजा व राजापूर तालुक्यात भात आणि नाचणीची अधिक उत्पादकता असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण या अवालात नोंदले गेले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या प्रकल्पांची संख्या व सहकारी औद्योगिक विकास मंडळाच्या क्षेत्रांतर्गत असलेल्या प्रकल्पांची संख्या शून्य आहे. याशिवाय विदेशी थेट गुंतवणूक, विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत उद्योगांची व मोठ्या उद्योगांची संख्या लांजा तालुक्यात 2021-22 या वर्षात झालेली नाही. लांजा तालुक्यात शेतीप्रधान व्यवसाय असून, इतर व्यवसाय त्याला पूरक आहेत. त्यामुळेच श्रममूल्य अधिक असल्याने प्रतिहेक्टरी उत्पादकता अधिक आहे. राजापूर तालुक्यात नाचणी विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत असलेला प्रकल्प आहे आणि अन्य बाबतीत कोणतेच प्रकल्प 2021-22 वर्षात नाहीत. याउलट राजापूर तालुक्यात नाचणीच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या तुलनेत तांदळाची प्रति हेक्टरी उत्पादकता 2 हजार 789 आहे. येथे नाचणीला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले आहे. उद्योगक्षेत्राचा अभाव असल्यामुळे उत्पन्नाचा प्रमुख मार्ग शेती असल्याने अधिक उत्पादकता ही लांजा व राजापूर तालुक्यात दिसून
येते.