राज्यातील भूस्खलन प्रवण ११ जिल्ह्यांत रत्नागिरीचा समावेश

इस्रो संस्थेचा अहवाल ; १४७ जिल्ह्याच्या यादीत १२९ वा

रत्नागिरी:- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये राज्यात २००० से २०२१ या कालावधीत भूस्खलनाच्या ५ हजार ११२ घटना घडल्या. देशातील एकूण भूस्खलन प्रवण १.४७ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ११ जिल्हा यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. भूस्खलनप्रवण १४७ जिल्ह्यांच्या यादीत रत्नागिरी जिल्हा १२९ वा आहे.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा नैसर्गिक आपत्तीला राज्य आणि जिल्ह्याला तोंड द्यावे लागत आहे. २०२१ मध्ये या नैसर्गिक आपत्तीचा जिल्ह्याने सामना केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. तीन ठिकाणी भूस्खलन होऊन काही घर त्या खाली गाडली गेली होती. थरकाप उडवणाऱ्या या घटना होत्या. लॅंडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया हा अहवाल इस्रोकडून प्रसिद्ध करण्यात आला. उपग्रह आणि मोबाइल उपयोजनाद्वारे (ॲप्लिकेशन) मिळालेल्या विदेचा वापर करून हा अहवाल तयार करण्यात आला. उपग्रह आणि उपलब्ध माहितीच्या आधारे देशभरातील काही भूस्खलनाचे विश्लेषण आणि छायाचित्रांचाही अहवालात समावेश आहे. अहवालात देशभरातील १७ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील भूस्खलनप्रवण १४७ जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली.

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा भूस्खलन प्रवण जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे. त्यात ठाणे जिल्हा ८० व्या स्थानी, पुणे १०७, रायगड १०५, सिंधुदुर्ग ११४, नाशिक १२८, रत्नागिरी १२९, अहमदनगर १३१, कोल्हापूर १३३, सातारा १३४, मुंबई उपनगर १३९, मुंबई १४०व्या स्थानी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माळीणच्या दुर्घटनेनंतर झालेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणामध्ये 16 दरडप्रवण क्षेत्र निश्‍चित केली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत भूस्खलनाचा धोका असलेली 63 गावे आढळून आली आहेत. आता त्यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे. दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली तर तेथील लोकांना स्थलांतर करण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती. प्रशासनाने आता आपत्कालिन यंत्रणेमध्ये मोठी सुधारणा केली आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकारामध्ये जीवितहानी कमी करण्यास मदत होणार आहे.